Sunday, October 25, 2015

गंगोत्री

बूडन जाण म्हणजे काय?
बुडवून मारणं म्हणजे काय?
मला माहितेय
लोकं दारुच्या नशेत बुडून जातात
काही दारू प्यायल्याने बुडून जातात
मी पहिलं होतं माझच मरण माझ्या डोळ्यांनी
जेंव्हा अडकलो होतो पाण्याच्या भोवऱ्यात
माझी जगण्याची धडपड
जीव तोडून हातपाय मारणं
दोनदा खाल्लेल्या गटांगळ्या
हे सारं पहात असलेल्या मित्राच्या डोळ्यात दिसलेली काळजी
आणि एका क्षणात त्या भोवऱ्यातुन कुठल्याशा उर्जेने बाहेर आलेला मी
जगण्याची इच्छा आकांक्षा खऱ्या अर्थाने अनुभवत होतो पण;
पण तू मात्र मला मारायचा विडा उचललायस
एखाद्या मुलीने किती सुंदर दिसावं याला काही मर्यादा?
तुला पाहून बेभान होतो मी
भरकटत जातो
तू मात्र स्थितप्रज्ञासारखी निश्चल
आपल्या कांतिच्या आभेने उजळलेली,
पहात असतेस माझं भरकटणं तुझ्या नशिल्या डोळ्यांनी,
मी मात्र झिंगुन जातो
बेभान होउन जातो
त्याच डोळ्यांच्या भोवऱ्यात अडकत जातो
नकळत खेचला जातो
पण या डोळ्यात बुडायचय मला
आकंठ बुडायचय
याच्यापेक्षा सुंदर मरण ते काय असेल
मीच तुला माझी सुपारी दिलीय समज
पण एकदा
एकदाच
एक कटाक्ष टाक माझ्याकडे
त्याच प्रेमळ नजरेने पहा
मझ्यातल्या अभिजात कलेची प्रेरणा असलेली तू
उरशील माझ्या कलेच्या रूपाने
पण मी आणि माझी कला मात्र माझे उरलो नाही
झालो आहोत फक्त तुझे
एखादं चित्रही जन्मतं तर त्याला कारण तुझे डोळे असतात तर कधी तुझं निलाखस हास्य
अशीच हसत रहा,
अशीच दिसत रहा,
अशीच वहात रहा,
माझ्या कलेच्या प्रेरणेची गंगोत्री होऊन
शांत,
संथ,
त्यातली एक डुबकी माझी कला पवित्र करेल.
© भूषण वैद्य