Friday, July 10, 2015

काकदृष्टी

जेजे च्या कट्टयावर बसलोय.
एकटाच.
निवांत.
संध्याकाळ झाली तरी समोर एका कावळ्याची नवं घरटं बांधण्यासाठी काड्या जमवण्याची लगबग चालुये.
जेजे मध्ये एवढे कावळे का आहेत? याच एक कारण काही सीनियर्स कडून मी ऐकल होतं, की म्हणे जे कलाकार खरोखर जेजे वर प्रेम करतात ते मेल्यावर सुद्धा कावळ्याच्या रूपाने जेजेमध्येच येतात. इकडचच जग त्यांना जास्त आवडतं.
ते एक संस्कृत सुभाषित आहे ना,
कावळ्याला जरी मानसरोवरात सोडलं तरी त्याच मन राजहंसाप्रमाणे तिथे रमत नाही.
पण आम्ही कलाकार कावळेच आहोत. आम्हाला कोणी राजहंसाप्रमाणे पाळू शकत नाही.
आमचा पिंडच वेगळा.
पु.ल.देशपांडेंनी हरीतात्यांच वर्णन केलय अगदी तस्सच आम्हा कलाकारांच.
आमच्या काकदृष्टीने आम्ही जे पाहतो ते पुष्काळांना सरळ दृष्टीने नाही दिसत.
कलाकाराला डोळे असतात पण ही काकदृष्टी इकडेच मिळते. 
आता पुन्हा पाऊस सुरु होईल.
वैशाख वणव्यात पोळुन निघालेली इकडची मृदा भिजुन जाईल. तोच आवडता मृदगंध दरवळेल. नव्या सृजनाला सुरुवात होईल. लॉन गवताने भरून जाईल.
कॉलेजमध्ये पण नव्या कलाकारांची फळी प्रवेश करेल. पुन्हा जेजे गजबजेल नव्या कावळ्यांनी.
काड्या काड्या जमवून बांधलेल्या त्या कावळ्याच्या घरट्याचं मात्र या पावसात काय होईल माहीत नाही.

न्यूडस्टडी

न्यूडस्टडी. कलाशिक्षणातील एक महत्वाचा विषय. एरवी एकमेकांना शिव्या घालून बोलावणारे मित्रसुद्धा या वेळी मात्र अगदी चिडीचुप आपापल ड्रॉइंग करत असतात. आयुष्यातल्या पहिल्याच न्यूडस्टडीला मॉडल समोर बसल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके कानात स्पष्ट ऐकू येतात.
परवाच जेजेच्या वार्षिक कलाप्रदर्शनात एका मॉडलचा सत्कार करण्यात आला. गेली 25 ते 30 वर्षांहून अधिक काळ त्या जेजेमध्ये मॉडल म्हणून बसल्यात. कित्येक कलाविद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांनी आपलं अर्ध्याहुन अधिक आयुष्य दिलय.
अशीच अजुन एक मॉडल जेजेमध्ये आहे. आमच्या न्यूडस्टडीच्या वेळेस तिने एका शिल्पाकडे बोट दाखवून आम्हाला सांगितलं "ये मैं ही हूँ. आपके कोई तो सर थे उन्होंने किया था ये, तब मैं 14 साल की थी" "आज बहुत सालो के बाद न्यूड बैठने के लिए आयी हूँ"
जे हिरव्या रंगात रंगवलेलं एका मुलीच सेमिन्यूड burst आम्ही इतके वर्ष पहात होतो ते याच मॉडलवरुन केलेलं होत.
असे कित्येक किस्से असतील न्यूडक्लास मधले.
पूर्वी न्यूडस्टडीच्या वेळेस मॉडल आणि विद्यार्थ्यांत संवाद फार कमी होता. शेजारी बसलेले विद्यार्थीही एकमेकांशी बोलत नसत. सारं गंभीर वातावरण.
आता मात्र हा संवाद वाढलाय. मॉडललाही कुतूहल असत कलाकृतीबद्दल. कलाकृतीवर चर्चा होतात. गप्पगोष्टी होतात.घरच्यांच्या चौकशीपासून ते मजा मस्ती पर्यंत मोकळं वातावरण असतं. अर्थात हे सार सर नसताना. सर आले की सार वातावरण पुन्हा गंभीर.
परदेशात न्यूडस्टडीसाठी व्यावसायिक न्यूड मॉडल मिळतात. आपल्या इथे मात्र न्यूड मॉडलला जास्त पैसे मिळतात म्हणून नाइलाजास्तव न्यूड बसणाऱ्या मॉडलच अधिक. अर्थात त्या बसतात म्हणून आपला अभ्यास होतो हे ही तितकेच महत्वाचे.
हे सार आठवण्याची गोष्ट म्हणजे हा विडियो.
कलाकार नसलेल्यांसाठी चार भिंतीत होणारा हा न्यूडस्टडी म्हणजे कुतुहलाची बाब.
न्यूडक्लास मधल एकूणच वातावरण. मॉडल आणि कलाविद्यार्थ्यांमधला संवाद. वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करुन केला जाणारा अभ्यास आपण या विडियोत पाहू शकतो.
(टिप : ज्यांना नग्नता म्हणजे केवळ अश्लीलता वाटते त्यांनी कृपया हां विडियो पाहू नये. आणि कमेंट मधून फुकाचे सल्ले देऊ नये. धन्यवाद)

जेजे

शिल्प जेजे, चित्र जेजे
जिजिभॉईंच चरित्र जेजे

सिरॅमीक जेजे, टेक्सटाईल जेजे
झोळीसोबत दाढीची स्टाईल जेजे

मेटल जेजे, इंटेरियर जेजे
कला क्षेत्रातलं करियर जेजे

प्रिंट जेजे, अप्लाईड जेजे
आमच्या मनाचं 'प्राइड' जेजे

ताल जेजे, सुर जेजे
कलेचं पंढरपुर जेजे

स्टूडियो जेजे, वर्ग जेजे
केवळ अन् केवळ स्वर्ग जेजे

दिवस जेजे, रात्र जेजे
सोबत वेडे मित्र जेजे

धुंद जेजे, कुंद जेजे
ओल्या मातीचा सुगंध जेजे

एकांकीका जेजे, शिल्पसाद जेजे
रंगातून मनाचा संवाद जेजे

रंग जेजे, माती जेजे
आयुष्यभराची नाती जेजे

पिंपळ जेजे, वड जेजे
रंगणाऱ्या गप्पांचा फड जेजे

कटिंग जेजे, सिगरेट जेजे
कॅन्टीनमागचा गेट जेजे

अध्यापक जेजे, डीन जेजे
लक्ष्मणच ते कॅन्टीन जेजे

मामा जेजे, मामांची चाळ जेजे
कलेशी जोडलेली नाळ जेजे

गणगोत जेजे, गोतावळा जेजे
कावकाव करणारा कावळा जेजे

ज्युनियर जेजे, सिनियरचा सल्ला जेजे
'कम ऑन जेजे'चा कल्ला जेजे

रंगलो जेजे, दंगलो जेजे
डीन सरांचा बंगलो जेजे

काष्ठ जेजे, पाषाण जेजे
आमच्यासाठी जीव की प्राण जेजे

आवड जेजे, हौस जेजे
श्रावणसरींचा पाऊस जेजे

शांत जेजे, निवांत जेजे
रंगानी भिजलेले नखशिखांत जेजे

नदी जेजे, सिंधु जेजे
आमचा मानबिंदु जेजे

साथ जेजे, सहवास जेजे
रंगणारा कॅनवास जेजे

कागद जेजे, कुंचला जेजे
दिग्गज कलकारांची शृंखला जेजे

भूक जेजे, तहान जेजे
कलक्षेत्रात महान जेजे

तंद्री जेजे, भान जेजे
चित्रातले समाधान जेजे

ध्येय जेजे, ध्यास जेजे
अन् आमुचा श्वास जेजे

हृदय जेजे, स्पंदन जेजे
न तुटणारं बंधन जेजे

क्षेत्र जेजे, तीर्थ जेजे
आयुष्याला अर्थ जेजे

भाव जेजे, भक्ती जेजे
कलाकाराची शक्ती जेजे

बाप जेजे, माय जेजे
'जमशेटजी जिजीभॉय' जेजे

उगम जेजे, अंत जेजे
आयुष्यातला वसंत जेजे

सम्राट जेजे, राजे जेजे
फक्त आणि फक्त माझे जेजे
फक्त आणि फक्त माझे जेजे
© भूषण वैद्य

Wednesday, July 8, 2015

उधळलेल्या तुझ्या रंगात (गझल)

उधळलेल्या तुझ्या रंगात असा रंगलो मी।
चित्र-शिल्पात तुला चितारण्यात दंगलो मी॥

कशाला करू मद्याचे प्याले जवळ मी।
नशिल्या तुझ्या डोळ्यांनी असा झिंगलो मी॥

नाही उरत मला भान समयाचे जराही।
सौंदर्य तुझे पाहण्यात असा गुंगलो मी॥

नकोच तुझ्या शब्दांचे घाव उरी अजुन हे।
आधीच तुझ्या अबोल्याने आहे भंगलो मी॥

© भूषण वैद्य

आयुष्यात तुझ्या येण्याने (गझल)

आयुष्यात तुझ्या येण्याने फुलला वसंत आता।
गातो आताशा तुझेच गाणे नाही उसंत आता॥

दिलीस तू साथ अशी, आयुष्यभर मला ती।
झालो कृतार्थ मी, ना तक्रार कशाची ना खंत आता॥

रहा सावध इथे, मोठी स्वार्थी आहे ही दुनिया।
सारेच इथे चोर, ना उरले सज्जन ना संत आता॥

देवासमोर उभा राहून, मागतोस भिक तूही।
काय उरला भेद, कोण गरीब कोण श्रीमंत आता॥

© भूषण वैद्य