Friday, July 10, 2015

काकदृष्टी

जेजे च्या कट्टयावर बसलोय.
एकटाच.
निवांत.
संध्याकाळ झाली तरी समोर एका कावळ्याची नवं घरटं बांधण्यासाठी काड्या जमवण्याची लगबग चालुये.
जेजे मध्ये एवढे कावळे का आहेत? याच एक कारण काही सीनियर्स कडून मी ऐकल होतं, की म्हणे जे कलाकार खरोखर जेजे वर प्रेम करतात ते मेल्यावर सुद्धा कावळ्याच्या रूपाने जेजेमध्येच येतात. इकडचच जग त्यांना जास्त आवडतं.
ते एक संस्कृत सुभाषित आहे ना,
कावळ्याला जरी मानसरोवरात सोडलं तरी त्याच मन राजहंसाप्रमाणे तिथे रमत नाही.
पण आम्ही कलाकार कावळेच आहोत. आम्हाला कोणी राजहंसाप्रमाणे पाळू शकत नाही.
आमचा पिंडच वेगळा.
पु.ल.देशपांडेंनी हरीतात्यांच वर्णन केलय अगदी तस्सच आम्हा कलाकारांच.
आमच्या काकदृष्टीने आम्ही जे पाहतो ते पुष्काळांना सरळ दृष्टीने नाही दिसत.
कलाकाराला डोळे असतात पण ही काकदृष्टी इकडेच मिळते. 
आता पुन्हा पाऊस सुरु होईल.
वैशाख वणव्यात पोळुन निघालेली इकडची मृदा भिजुन जाईल. तोच आवडता मृदगंध दरवळेल. नव्या सृजनाला सुरुवात होईल. लॉन गवताने भरून जाईल.
कॉलेजमध्ये पण नव्या कलाकारांची फळी प्रवेश करेल. पुन्हा जेजे गजबजेल नव्या कावळ्यांनी.
काड्या काड्या जमवून बांधलेल्या त्या कावळ्याच्या घरट्याचं मात्र या पावसात काय होईल माहीत नाही.

No comments:

Post a Comment