Wednesday, October 31, 2018

कर्मयोगी शिल्पकार

कर्मयोगी' शिल्पकार


       भारत सरकारतर्फे या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यातील पद्मभूषण पुरस्कारातलं एक नाव असं होतं ज्याने पद्मभूषण पुरस्काराचाच सन्मान व्हावा. अर्थात ते नाव म्हणजे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार. वयाच्या ९१व्या वर्षीसुद्धा हातात माती घेऊन भली मोठी शिल्प ते अगदी सहज करतात. एखाद्या तरुण कलाकारालादेखील लाजवेल इतका उत्साह असलेले राम सुतार हे खरेखुरे ‘कर्मयोगी’ आहेत.
 शिल्पकलेत काहीतरी जबरदस्त करण्याच्या ईर्ष्येने महाराष्ट्र सोडून दिल्ली गाठणाऱ्या राम सुतार यांच्यासाठी जीवनप्रवास हा संघर्षमय होता.भारतीय कलाजगतात त्यांची ओळख म्हणजे आज संसद भवनाच्या प्रवेशद्वारापुढे डोळे मिटून ध्यानमग्न बसलेले महात्मा गांधी यांचं सोळा फूट उंच ब्राँझचं भव्य शिल्प आणि लोकसभा अध्यक्षांच्या प्रवेशद्वारापुढे  उभं असलेल २१ फूट उंचीचं छत्रपती शिवाजी महाराजांच ब्राँझचं शिल्प याच्यासह संसद भवन परिसरातील तब्बल सोळा शिल्प पद्मभूषण राम सुतार यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत उभी आहेत. शिल्पकार राम सुतारांनी जवळपास सर्वच ज्येष्ठ राजकीय नेत्यांची शिल्प घडवली आहेत. सुतार यांनी शिल्पकलेत गाठलेली उंची म्हणजे त्यांची शिल्पकला जगभर पसरली आहे.  ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, रशिया, बार्बाडोस, जर्मनी, फ्रांस, मलेशिया, आर्जेन्टिना, इटली किती नावं घ्यावीत?  दीडशेहून अधिक देशांमध्ये सुतारसरांनी साकारलेली महात्मा गांधींची ३०० हून अधिक शिल्प उभी आहेत. त्यातीलच एक गांधीजींच शिल्प दीड वर्षांपूर्वी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०१४ रोजी ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन येथे बसवण्यात आलं, त्याचबरोबर १२ एप्रिल २०१५ ला जर्मनी येथे गांधीजींचा अर्धपुतळा बसवण्यात आला या दोन्ही शिल्पांच अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सुतारांनीच घडवलेला ४२ फुट उंचीचा गांधीजींचा अर्धपुतळा २०१५ मध्येच तुर्कमेनिस्तान आणि मॉरीशस येथे बसवण्यात आला, तर ४२ फुट उंचीचा रवीन्द्रनाथ टागोर यांचा अर्धपुतळा चीन आणि ताझीकीस्तान या दोन्ही देशात बसवण्यात आला. (४२ फुट जर अर्ध पुतळा असेल तर केवळ चेहराच केवढा असेल याचा आपण केवळ अंदाजच करू शकतो, पण सुतार सर या सगळ्याच माती काम अगदी सहज करतात) त्यांनी घडवलेले शिवाजी महाराज, रणजितसिंह, पृथ्वीराज चौहान, संत तुकाराम महाराज, भगवान परशुराम, कृष्णार्जुन रथाचं स्मारक शिल्प, शिवराय -समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांचं पुणे विमानतळावरील उत्थित शिल्प, भगतसिंह, महात्मा ज्योतिबा फुले,  नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच अनेक राजकीय नेते यांचे पुतळे पूर्ण देशभरातील राज्यात, त्यांच्या विधानसभेबाहेर, विमानतळाबाहेर चौकात दिमाखात उभे आहेत. कला आणि तंत्र यांचा अजोड संगम असलेली राम सुतार सरांची शिल्पं केवळ शिल्पं न राहता त्या त्या ठिकाणची प्रतिकं झाली आहेत. अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठेशाहीप्रमाणे  या मराठी शिलेदाराने शिल्पाकृतीच्या माध्यमातून अख्खं जग जिंकलं आहे.  विनायक पांडुरंग करमरकर आणि गणपतराव म्हात्रे अशा दिग्गज शिल्पकारांचा शिल्पकलेचा वारसा पुढे चालवून राम सुतार यांनी कलातपस्वी म्हणून आयुष्यभर शिल्पसाधना केली आहे. काँक्रीट, संगमरवर, काष्ठ, ब्रॉन्झ या सर्व माध्यमात त्यांनी आजवर हजारो शिल्प घडवली आहेत. सर जे जे स्कूल ऑफ आर्टने भारतीय कलाजगताला अनेक रत्न दिली, त्यापैकीच एक रत्न म्हणजे पद्मभूषण श्री. राम सुतार.
           जानेवारी २०१० ला बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे त्यांच्या आतापर्यंतच्या कालासाधानेसाठीचा गौरव म्हणून सुतारांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला. त्याच दरम्यान त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टला आवर्जून भेट दिली. त्या वर्षी मी जेजे ला द्वितीय वर्षाला होतो. त्यांना भेटण्याचा तो माझ्या आयुष्यातला पहिलाच योग होता. सुतार सर आमच्या शिल्पकला विभागात आले आणि मग शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. त्यांच्या विद्यार्थीदशेतल्या गमतीजमती सांगताना ते अगदी रंगून गेले होते. इतका साधा आणि सरळ स्वभाव. कुठेही मोठेपणाचा आव नाही की आपण आता मोठे शिल्पकार असल्याचा अहंपणा नाही. पेहरावही अगदी साधा; सदरा आणि लेंगा. ते म्हणतात ना मोठ्या वृक्षांना फळे लागली की ती आपोआपच झुकतात, नम्र होतात. हल्लीच्या काळात जरा प्रसिद्धी मिळाली कि कलाकार हवेत जातात, स्वभाव आणि वागणं पण कृत्रिम होत जातं. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कलेचीच गळचेपी करतात. राम सुतार सर मात्र याला अपवाद आहेत. स्व. शिंत्रे सरांनी स्वतःच्या हाताने घडवलेले शिसमच्या लाकडापासून बनवलेले वायर टूल्स मोठ्या मातीकामासाठी सुतार सरांना भेट म्हणून दिले होते. ते पाहून सरांचा चेहरा खुलला आणि ते अजूनच मनमोकळ्या गप्पा मारू लागले. विद्यार्थ्यांना आपल्या साठ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीविषयीचं मर्म सांगताना ते म्हणाले की "सतत काम करत राहा. कामात सातत्य असलं की मनुष्य कुठल्या कुठे पोहोचतो आणि याच तत्त्वज्ञानावर माझा दृढ विश्वास आहे. परिस्थितीचे दु:ख करत बसू नका. मिळेल ते काम योग्य प्रकारे करत रहा" या वयातही उत्साहीपणे काम करणाऱ्या सुतार सरांचा हा सल्ला आम्हा तरुण शिल्पकरांसाठी अगदी लाखमोलाचा आहे. 
        राम सुतार सरांचा जन्म धुळे जिल्ह्यात गोंदूर या गावी १९ फेब्रुवारी १९२५ला झाला. त्यांचे वडील वनजी हंसराज सुतार हे शेतीची अवजारं बनवण्याचं काम करायचे. त्यांच्या आठ अपत्यांपैकी दुसरं अपत्य म्हणजे राम सुतार सर. त्यांना ३ भाऊ आणि ४ बहिणी.  त्यांच्यावर लहानपणी आणि तरुण वयात शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांचे संस्कार झाले.राम सुतार यांच्यात सुतारकाम ,लोहारकाम, चित्रकला, वास्तुशास्त्र हे गुण लहानपणापासूनच होते. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा नसल्याने त्यांनी दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण पूर्ण केले. आपल्या उपजत गुणांच्या जोरावर त्यांनी ११वी ला शिकत  असताना हैदराबाद येथे १२फूट उंच त्रिमूर्ती बनवली होती. त्यांच्यातले हे गुण हेरून गुरू रामकृष्ण जोशी यांनी त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेण्यासाठी उद्युक्त केलं. तिथे त्यांनी शिल्पकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण तर घेतलंच त्यासोबत मानाचं समजलं जाणार मेयो मेडल त्यांना मिळालं आणि १९५३ ला ते प्रथम क्रमांकाने जी.डी.आर्ट उत्तीर्ण झाले.
त्यानंतर १९५३ ते १९५८ या काळात औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात अजिंठा व वेरुळच्या लेण्यांमधील भग्न झालेल्या शिल्पांना पूर्ववत करण्याचे काम त्यांनी केले. वेरुळमधील पुरातत्त्व विभागाची नोकरी सोडल्यावर ते नोव्हेंबर १९५९ मध्ये दिल्लीतील दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालयात तांत्रिक सहायक म्हणून काम पाहू लागले. पण त्यांच्यातला शिल्पकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. सरकारी नोकरीत असताना बाहेरची कामे करणे आणि शिल्पांच्या ऑर्डर घेण्यास मनाई असल्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आता दिल्लीतच त्यांचा व्यावसायिक शिल्पकार म्हणूनच पुढच्या आव्हानांना तोंड देण्यासाठीच प्रवास सुरु झाला. लवकरच सर्वात पहिले ऐतिहासिक शिल्प त्यांच्या हातून घडणार होते. मध्य प्रदेश सरकारने चंबळ नदीवर गांधीसागर धरण बांधायला सुरुवात केली होती. या धरणासाठी चंबळदेवीचे ४५ फूट उंचीचे शिल्प काँक्रीटमध्ये बनवण्याचे आव्हान राम सुतारांनी स्वीकारले आणि अहोरात्र मेहनत करून चिकाटीने हे काम पूर्ण केले. त्याच शिल्पाने त्यांचा व्यावसायिक शिल्पकार म्हणून उदय झाला. चंबळदेवी आणि तिच्या पायाला मिठी मारून उभे असलेले दोन बालक म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांचे प्रतीक आहेत. आपल्या आयुष्यात परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या सुतारांनी त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या यशाचा अश्वमेध जो सुसाट सुटला तो सारं जग पालथं घालायच्या इर्षेनेच. 
     देशातील विविध शिल्पप्रकल्पांना पूर्णत्वास नेताना सुतारांचा बऱ्याच बड्या राजकीय नेत्यांशी जवळून संपर्क आला. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, नरसिंह राव,अटलबिहारी वाजपेयी वगैरे. वाजपेयींच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आदरभाव होता. अटलजींच्या काळातच म्हणजेच १९९९ला राम सुतारांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले.
           आपल्या दिल्लीतील स्टुडिओत सतत कार्यमग्न असणाऱ्या सुतार सरांना खरा हातभार लागला तो त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्याकडून. स्थापत्यशास्त्राची पदवी घेतलेले अनिल सुतार हे वडिलांसोबत दिल्लीतील आपला स्टुडिओ सांभाळतात. डोळे दिपवून टाकणारी प्रगती राम सुतारांनी गेल्या ६०वर्षात अथक प्रयत्नाने साधलीय. दिल्लीत राहून साऱ्या जगभर आपल्या शिल्पाचा दबदबा निर्माण केलाय. त्यांची प्रगती पाहून खरंच उर अभिमानाने भरून येतो आणि एकच ओळ आठवते ती म्हणजे 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा'
            वयाच्या ९१व्या वर्षीही त्यांची उमेद अजूनही कायम आहे. गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हे सरदार वल्लभभाई पटेलांच १८२ मीटर म्हणजेच साधारण ६०० फूट उंचीचं भव्य शिल्प उभारण्याची त्यांनी इच्छा आहे. आणि हे काम त्यांना मिळाल्यास ते नक्कीच त्याचं सोनं करतील. 
          यशाची एवढी शिखरं पादाक्रांत करूनदेखील पाय जमिनीवर असणारे पद्मभूषण श्री. राम सुतार यांचं कार्य समस्त महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानास्पद आहे. तुमच्यातल्या अवलिया आणि सतत कार्यमग्न असणाऱ्या 'कर्मयोगी शिल्पकाराला' आमचा मानाचा मुजरा. तुम्ही दीर्घायुषी व्हावं याच सदिच्छा!


©भूषण वैद्य


No comments:

Post a Comment